। कळंबोली । प्रतिनिधी ।
कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरातील प्लॉट क्रमांक 334, तुकाराम वेअरहाऊसच्या उजव्या बाजूला असलेल्या पेंट कंपनीला रविवारी (दि.15) भीषण आग लागली. कंपनीमध्ये थिनरचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल आणि खारघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, आग विझविण्याचे काम सुरू असताना रासायनिक पदार्थाचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचा एक जवान आणि एक स्थानिक कामगार असे दोघे जखमी झाले.
पेंट कंपनीमध्ये थिनरला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवानांनी तातडीने होज रील, मॉनिटर बूम आणि होज लाईनच्या साहाय्याने पाण्याचा मारा सुरू केला. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल 22 फोम कॅनचा वापर करण्यात आला.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन कळंबोलीसह नवीन पनवेल, पनवेल आणि खारघर अग्निशमन केंद्रांची अतिरिक्त मदत मागविण्यात आली. चारही अग्निशमन केंद्रांच्या जवानांनी समन्वयाने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आग विझविण्याचे काम सुरू असतानाच केमिकलचा स्फोट झाला. यामध्ये कळंबोली अग्निशमन केंद्रातील अग्निशामक विशाल ठाकरे (28) आणि स्थानिक कामगार महेंद्रकुमार गुप्ता (37) हे दोघे जखमी झाले. ठाकरे यांना सत्यम रुग्णालयात, तर गुप्ता यांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, खारघर अग्निशमन केंद्राचे अधिकारी सौरभ पाटील, उपअग्निशमन अधिकारी मनीष ब्राह्मणकर, फत्तेसिंग गायकवाड तसेच संबंधित अग्निशमन केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बचावकार्य आणि आग नियंत्रण मोहिमेत सहभाग घेतला. कळंबोली पोलिसांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.






