माजी उपमहापौर तथा नगरसेविका सीता ताई पाटील आणि सभागृह नेते प्रकाश बिणेदार यांच्यावर गणेश वाघीलकर यांना शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप; दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रार अर्ज
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका मुख्यालयाचे प्रवेशद्वारच राजकीय वादाचे आखाडे बनल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी उपमहापौर तथा नगरसेविका सीता ताई पाटील, सभागृह नेते प्रकाश बिणेदार आणि भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित पदाधिकारी गणेश वाघीलकर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आर्थिक व्यवहार आणि सीता ताई पाटील यांच्याबाबत कथित अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लोकप्रतिनिधींकडून झालेल्या या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी संयम आणि सभ्यतेचे भान सोडून कॉलेजमधील विद्यार्थ्यांप्रमाणे रस्त्यावर वाद घालणे, हे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याची टीका होत आहे.






