बाजारात पूजेच्या साहित्याची खरेदी सुरु
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
हिंदू धर्मातील महत्त्वाचा आणि मंगलमय सोहळा मानल्या जाणाऱ्या तुळशी विवाहाची तयारी आता पनवेलमध्ये सुरू झाली आहे. शनिवारी एकादशीचा सोहळा संपन्न होताच तुळशी विवाहाच्या धार्मिक विधींना सुरुवात होणार असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. पनवेलमधील रायगड बाजार परिसरात तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
तुळशी विवाह म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृतीतील परंपरा, श्रद्धा आणि मंगलमय वातावरणाचा सुंदर संगम मानला जातो. घराघरांत तुळशी वृंदावनाची सजावट करून तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या स्वरूपातील शाळिग्राम किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो. या सोहळ्यासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. बाजारात तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेला ऊस, बोर, आवळा, फळे, फुले, हार, हळद-कुंकू, अक्षता तसेच पूजेचे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर लग्नसोहळ्याप्रमाणे तुळशी वृंदावनाभोवती सजावट करण्यासाठी लागणाऱ्या मांडवाच्या मांडोळ्या आणि इतर सजावटीच्या साहित्यालाही मागणी वाढली आहे.
तुळशी विवाहासाठी ऊसाचा मांडव उभारण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते. तुळशी वृंदावनाला आकर्षक सजावट करून दिव्यांची रोषणाई केली जाते. विवाह सोहळ्याप्रमाणे तुळशीला साडी, दागिने आणि फुलांनी सजवले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टकांच्या गजरात विवाह सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे, शहरातील आधुनिक जीवनशैलीतही नागरिकांनी आपल्या धार्मिक परंपरा जपल्या आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये या सोहळ्याबाबत उत्साह दिसून येतो. अनेक कुटुंबांमध्ये तुळशी विवाहानंतर शुभकार्य आणि विवाह सोहळ्यांच्या मुहूर्तांना सुरुवात करण्याची परंपरा आहे. एकीकडे दिवाळीचा उत्साह ओसरत असताना तुळशी विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.






