गोफण ते सानेगाव (चावरे) परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल
जिल्हा परिषदेकडून निविदा काढण्यास दिरंगाई
| रायगड | प्रमोद जाधव |
गोफण ते सानेगाव (चावरे) ही जलवाहतूक सेवा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. फेरीबोट सेवा बंद असल्याने एक तासाचे अंतर कापत रस्त्याचा मार्गाचा अवलंब करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. जिल्हा परिषदेकडून फेरी बोटसाठी निविदा काढली नसल्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसत आहे. जलमार्गाच्या दहा रुपयांच्या प्रवासासाठी निविदा अभावी रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. परिणामी, या प्रवासासाठी दीडशे रुपये मोजावे लागत असल्याचा आरोप तेथील प्रवाशांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोफण ते सानेगाव (चावरे) हा जलप्रवास रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या (रेवदंडा खाडी) पात्रातून केला जातो. गोफण ते सानेगाव ही दोन्ही गावे कुंडलिका नदीच्या खादी किनारी वसलेली आहेत. या दोन्ही गावांना जोडण्यासाठी आणि नदी पलिकडील गावांसह भागांमध्ये जाण्यासाठी स्थानिक पातळीवर फेरी बोट सेवेचा वापर केला जातो. सानेगाव जेट्टीवर उतरल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात चावरे अथवा आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी स्थानिक रस्ते आदी मार्गाचा वापर होतो. मात्र गेल्या वर्षभरापासून गोफण ते सानेगाव (चावरे) फेरीबोट सेवाच बंद आहे. जिल्हा परिषदेकडून त्याची निविदा काढण्यात आली नाही. त्यामुळे सानेगाव शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त सानेगाव व अन्य परिसरातील गावांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना खाडीला वळसा मारून जावे लागत आहे. फेरी बोटीतून दहा रुपयात होणारा प्रवासासाठी रस्त्याने दीडशे ते दोनशे रुपयांवर गेला आहे.
गोफण ते सानेगाव या फेरी बोटीतील दहा मिनिटातील अंतरासााठी रस्त्याने एक तासहून अधिक वेळ वाया जात आहे. आर्थिक भुर्दंडासह प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा वेळही वाया जात आहे. सानेगाव ते गोफण हे थेट जलमार्गाचे अंतर अत्यंत कमी असताना जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे अंतर लांब पडू लागले आहे. गेल्या वर्षभरापासून गोफण ते सानेगाव फेरी बोटीची निविदा काढण्यात आली नाही. त्याचा परिणाम गोफण, सानेगाव परिसरातील नागरिकांच्या वाहतूक सेवेवर होत आहे. हेलपाटे मारीत प्रवास करण्याची वेळ आली असल्याचा आरोप स्थानिकांसह सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंगारे यांच्याकडून करण्यात आला आहे. ही सेवा लवकरात लवकर चालू करण्याची मागणीदेखील निवेदनातून त्यांनी केली आहे. त्यामुळे ही सेवा कधी चालू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
शाळेच्या स्थानिक समितीकडून जिल्हा परिषदेला पत्र
सानेगाव येथील साने गुरुजी विद्यात निकेतन विद्यालयात गोफण, भागीर्थीखार, कुंभोशी, शेडसई, अशा अनेक गावांमधून असंख्य गरीब, गरजू विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी येतात. गोफण ते सानेगाव या जलमार्गे फेरी बोटीतून विद्यार्थी शाळेत येतात. मात्र ही सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे गोफण ते सानेगाव होडी वाहतूकीला परवानगी मिळावी, अशी मागणी विद्यालयाच्या स्थानिक समितीकडून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
गोफण ते सानेगाव (चावरे) या फेरीबोटीचा ठेका रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालविला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून हा ठेका बंद झाला आहे. जिल्हा परिषदेकडून अद्याप फेरी बोटीचा निविदा काढण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सहकार्य केले जाईल.
– अमर पालवणकर-बंदर निरीक्षक,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रेवदंडा
वर्षभरापासून गोफण ते सानेगाव (चावरे) हा फेरी बोटीचा प्रवास बंद आहे. जिल्हा परिषदेकडून या जलमार्गाची निविदा अद्याप काढली नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहे. जलवाहतूक बंद असल्याने जास्त पैसे भरून रस्त्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. फेरीबोटीची सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
– अमोल शिंगारे, सामाजिक कार्यकर्ते
गोफण ते सानेगाव ही जलवाहतूक बंद आहे. ही सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची लवकरच बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल.
– मधूकर पाटील, उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती,
रायगड जिल्हा परिषद






