रात्रंदिवस अवजड वाहनांचा गोंगाट, धुळीचा त्रास; तीन गावांचा उपोषणाचा इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
टाटा पॉवरच्या भिवपुरी जलविद्युत प्रकल्पातील सुरूंग स्फोट, अवजड वाहनांची रात्रंदिवस वाहतूक आणि क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे तापकीरवाडी, मोरमारेवाडी आणि धनगरवाडीतील ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे. वारंवार आंदोलने करूनही कंपनीकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवरचा एक हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणापासून तापकीरवाडी, मोरमारेवाडी आणि धनगरवाडी ही गावे अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर आहेत. प्रकल्पातील सततच्या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसत असून काही घरांना तडे गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. डंपर, जेसीबी, पोकलेन आणि अन्य अवजड वाहनांच्या अखंड वाहतुकीमुळे प्रचंड आवाज होत आहे. क्रशरमधून उडणारी धूळ घराघरांत शिरत असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या कामांमुळे ग्रामस्थांची झोपही उडाली आहे.
या त्रासाविरोधात गेल्या दीड वर्षांत दोन ते तीन वेळा आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली. ग्रामपंचायतीनेही कंपनीकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, कंपनीकडून आश्वासनांपलीकडे काहीच कार्यवाही झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामस्थ हेमंत नवले यांनी जिल्हाधिकारी, कर्जत तहसीलदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच टाटा पॉवरच्या भिवपुरी कॅम्प व्यवस्थापनाला पत्र देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 25 नोव्हेंबर रोजी कंपनी व्यवस्थापन आणि तिन्ही गावांच्या ग्रामस्थांमध्ये बैठक झाली. मात्र, ग्रामस्थांच्या एकाही मागणीवर ठोस निर्णय झाला नसल्याने ही चर्चा निष्फळ ठरली.
यापूर्वीही कंपनीने वर्षभरापूर्वी अशीच आश्वासने दिली होती. त्यामुळे पुन्हा आश्वासन देऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता कंपनी व्यवस्थापनाने मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली आहे. या कालावधीत भिवपुरी आणि बॉम्बे हाऊस व्यवस्थापनाशी चर्चा करून ग्रामस्थांना लेखी आश्वासन द्यावे; अन्यथा तिन्ही गावांतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.






