। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रात रेशनकार्ड धारक सभासद पडताळणी सुरू असून माथेरान मध्ये दुकानदार मार्फत ही पडताळणी विभागवार होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. या पडताळणीमुळे ज्याला रेशनकार्डची गरज आहे त्याला आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. रेशनिंगच्या दुकानात आधारकार्ड लिंक करण्यासाठी पडताळणी करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर पर्यंत ही पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुकानात गर्दी होऊ नये म्हणून दुकानदार स्वतः प्रत्येक विभागात जाऊन गर्दी न करता रेशनकार्ड मधील प्रत्येक सभासदाचे आधार लिंक करणे सुरू झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही नागरिक व मुले यांचे बोटांचे ठसे येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. पूर्ण राज्यात रेशनकार्ड सभासद पडताळणी सुरू असून कर्जत तालुक्यातही पडताळणी सुरू झाली आहे. सर्वत्र बॅनर लावून जनजागृती केली आहे. ज्या नागरिकांचे ठसे येत नाहीत अशा नागरिकांचा अहवाल बनवून तो शासनास सादर करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत सर्व लोकांनी रेशनकार्ड व आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.







