रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात नितेश राणे यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जमिनासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज सादर केला होता. मात्र त्यांचा हा अर्ज कोर्टाने नामंजूर केला. या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे असे कोर्टाने सांगितले.
दरम्यान आज राणे यांच्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड संग्राम देसाई यांनी दिली. या निकालाची सुनावणी 4 जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 18 डिसेंबर रोजी कणकवली शहरातील नरडवे फाट्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणार्या चार आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींना अटक झाली. यातील एका आरोपीला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते. अटक झालेला सचिन सातपुते हा नितेश राणे यांचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे व संदेश सावंत यांनी 27 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
शिवसैनिक हल्ला प्रकरणानंतर आमदार नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. या घटनेमुळे सिंधुदुर्ग बॅक निवडणूकीत वातावरण चांगलेच तापले होते. तसेच मुंबईत बॅनर बाजीला सुरुवात झाली. मुंबईतील चर्चगेट या ठिकाणी नितेश राणे यांच्या फोटोसहीत एक बॅनर लावण्यात आला होता.संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवारीनंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली. त्यांना कोर्टाने अर्ज नामंजूर केल्यानंतर आज परत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला. उद्या काय सुनावणी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.