। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील पीडित तीन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची घृणास्पद घटना 29 डिसेंबर 2020 साली घडली होती. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यात याचे पडसाद उमटले होते. हा खटला जलदगती न्यायालयात अलिबाग येथे सुरू झाला आहे. विशेष पोस्को न्यायालयात आजपासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी तक्रारदार आणि पंच याची साक्ष तपासली असून आरोपी पक्षाकडूनही उलट तपासणी घेण्यात आली आहे.
14 ते 16 फेब्रुवारी असे सलग तीन दिवस या खटल्याची सुनावणी सुरू राहणार असून 15 साक्षीदार तपासणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. भूषण साळवी यांनी दिली आहे.
29 डिसेंबर 2020 साली पेणमधील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली.
आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड उज्वल निकम याची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील अॅड भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.
पेण पोलिसांनी आरोपी विरोधात अलिबाग येथील पोस्को न्यायालयात खटला दाखल केला आहे. आज या खटल्याची सुनावणी विशेष पोस्को न्यायायलात न्यायाधीश शहिदा शेख याच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे तक्रारदार आणि पंच याची तपासणी साक्ष घेण्यात आली. आरोपी पक्षातर्फेही उलट तपासणी घेण्यात आली. 14, 15 आणि 16 फेब्रुवारी असे तीन दिवस सलग सुनावणी न्यायालयात सुरू राहणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सार्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.