मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वटपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता.24) अलिबागमधील कुंटे बाग व वरसोली समुद्रकिनारी वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींमध्ये 1 लाख 60 हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाभरात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अत्तापर्यंत टाकला, सुरू, करंज, वड, आंबा, नारळ, शेवगा, चिंच यासह इतर प्रजातींची सुमारे 45 हजार झाडे लावण्यात आली आहेत. तसेच गुरुवारी वटपोर्णिमेनिमित्त अलिबागमधील कुंटे बाग व वरसोली समुद्रकिनारी वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, उपशिक्षणाधिकारी कल्पना काकडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. दिप्ती देशमुख, गटविस्तार अधिकारी डॉ. कैलास चौलकर, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी जयवंत गायकवाड, संवादतज्ज्ञ सुरेश पाटील, कृषी विस्तार अधिकारी राजेश घरत, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलींद कवळे, ग्रामसेवक दिनानाथ म्हात्रे उपस्थित होते.