। नागपूर । वृत्तसंस्था ।
लहानपणी सोसायटीतील मुलांसोबत ती गल्ली क्रिकेट खेळायची. चेंडू जोरजोराने मारून शेजार्यांच्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फोडायची. त्यामुळे अनेकवेळा शेजारी रागवायचे. पण तिने कधी मनावर घेतले नाही किंवा त्याची पर्वाही केली नाही. पुढे याच मुलीने क्रिकेटमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून आपल्या परिवारासह जिल्ह्यालाही नावलौकिक मिळवून दिला. ही मुलगी आहे विदर्भाची अष्टपैलू क्रिकेटपटू दिशा कासट. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी जवळ असलेल्या सातेगावमध्ये जन्मलेल्या दिशाला लहानपणी मुलांसोबत खेळायला खूप आवडत. गावात सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमरावतीला मोठ्या आईकडे आली. दिशाची क्रिकेटमधील आवड लक्षात घेऊन मोठी आई तिला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात घेऊन गेली. तिथे प्रॅक्टिस करीत असतानाच क्रिकेट प्रशिक्षक दीनानाथ नवाथे यांच्या सल्ल्यानुसार ती अंडर 19 च्या ट्रायल्ससाठी नागपूरला आली. ट्रायल्समध्ये दिशाची मध्यमगती गोलंदाजी निवडकर्त्यांना आवडल्याने तिची 20 खेळाडूंच्या कॅम्पमध्ये निवड झाली. शिबिरातही प्रभावी कामगिरी केल्याने तिचा विदर्भाच्या अंडर 19 संघात प्रवेश होऊन दिशाच्या क्रिकेट कारकिर्दीला खर्या अर्थाने सुरुवात झाली.
क्रिकेटमध्ये झेप घ्यायची असेल तर सोयीसुविधा असलेल्या मोठ्या शहरात येणे आवश्यक होते. त्यामुळे बारावीची परीक्षा आटोपताच दिशाने थेट नागपूर गाठले. 19 व 23 वर्षांखालील क्रिकेटमध्ये चमकदार प्रदर्शन करत ती अल्पावधीतच सीनियर संघात दाखल झाली. 24 वर्षीय दिशाने मागील तिन्ही सीझनमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले. 2019-20 मधील तीन वनडेत 79.80 च्या उत्कृष्ट सरासरीने 241 धावा काढल्यानंतर 20-21 मध्येही 65.48 च्या सरासरीने 203 धावा फटकावल्या. नुकत्याच संपलेल्या सीझनमध्येदेखील तिची बॅट चांगलीच तळपली. 79.56 च्या सरासरीने एक शतक व दोन अर्धशतकांसह केवळ चार सामन्यांत 292 धावा ठोकून तिने आपल्यातील टॅलेंट दाखवून दिले. घरगुती स्पर्धेतील या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दिशाची प्रतिष्ठेच्या चॅलेंजर स्पर्धेसाठी निवड झाली. दिशाने चॅलेंजर स्पर्धेतही इंडिया अ संघाकडून खेळताना अमिट छाप सोडली. दिशाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाकडून खेळण्याची इच्छा आहे. तिची झपाट्याने होत असलेली प्रगती लक्षात घेता, तिचे स्वप्न पूर्ण होईल, यात शंका नाही.
घरच्यांचा सपोर्ट
जिल्हा व विभागीय स्तरावर व्हॉलिबॉल खेळलेल्या दिशाच्या यशात जेवढी मेहनत तिची स्वतः आहे, तितकेच योगदान घरच्यांचेही आहे. एकुलती एक मुलगी असूनही कृषी केंद्र चालविणार्या वडिलांनी (दीपक कासट) आपल्या मुलीच्या आवडीनिवडी जपल्या. तिुला जे योग्य वाटते ते तू कर, असे ते नेहमीच दिशाला सांगत. तसेच संपूर्ण कुटुंबही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिल्याचे दिशाने सांगितले.