कोरोना संसर्गित रुग्णांची दोन दोनदा यादीत नावे; आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा रुग्णांना मनस्ताप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील मृत कोरोना रुग्णांचे नाव महिन्यानंतर यादीत आलेले प्रकरण ताजे असतानाच आता अलिबाग तालुक्यातील कोरोना संसर्गित रुग्णांचे नाव एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांत दुसर्यांदा रुग्णांच्या यादीत आले आहे. या प्रकारामुळे संबंधितांना नातेवाईक तसेच परिचयातील लोकांचे फोन येण्यास सुरुवात झाल्याने त्यांना मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. पॉझिटिव्हीटी रेट दाखविण्यासाठी असा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप आरोग्य विभागावर केला जात आहे.
19 जून रोजी मुरुड तालुक्यातील रुग्णांच्या यादीत नावे जाहीर झालेली पाहताच अनेकांना धक्का बसला होता. यात तब्बल 1 महिन्यापूर्वी कोरोनाने मृत झालेल्या रुग्णाचे नाव आले होते. त्याचप्रमाणे महिनाभरापूर्वी संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांची नावे देखील या यादीत होती. हा प्रकार झाल्यानंतर संबंधीत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना होत असलेल्या चौकशीमुळे मनस्तापाचा सामना करावा लागला होता. तसाच प्रकार अलिबाग तालुक्यातील नावांसहित शेअर होत असलेल्या यादीतून समोर आला आहे.
9, 24 आणि 25 जून या तीन दिवसांतील यादीमध्ये कुरुळ येथील तीन रुग्णांची नावे पुन्हा पुन्हा आली आहेत. ही नावे पाहून त्या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईक, कार्यालयातील सहकारी यांनी त्यांना फोन करुन तुम्हाला पुन्हा कोरोना झाला असल्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. दोन-तीन दिवस सतत येत असलेल्या फोनमुळे या नागरिकांना मोठया प्रमाणावर मनस्तापाचा सामना करावा लागला.
दरम्यान, यांसदर्भातील माहितीसाठी आरोग्य विभागाकडे चौकशी करण्यात आल्यानंतर झालेला प्रकार लपविण्यासाठी संबंधीत नागरिकांना आरोग्य विभागातून कॉल करुन कोणी विचारले तर आम्ही दुसर्यांदा टेस्ट केली होती, त्यामुळे आमची नावे आली असावातीत, असे सांगा असे सांगण्यात आले.
चोराच्या उलट्या बोंबा
आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभाग कारण पुढे करतानाकाही रुग्ण कोरोना गेला हे पाहण्यासाठी पुन्हा टेस्ट करीत असल्याने त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याने दुसर्यांदा नावे प्रकाशित होत असावीत, असा कांगावा करीत आहे. मात्र एकदा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची किमान 14 दिवस पुर्ण झाल्याशिवाय पुन्हा टेस्ट करता येत नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे दुसर्यांदा टेस्ट होऊच शकत नाही. असे असल्याने आरोग्य विभागाचा हा दावा फोल ठरत आहे.
काही रुग्ण कोरोना गेला हे पाहण्यासाठी पुन्हा टेस्ट करीत असल्याने त्यांची टेस्ट पॉझेटिव्ह येत असल्याने दुसर्यांदा नावे प्रकाशित होत असावीत. असे करताना नावांची तपासणी करण्यात येईल
डॉ. अभिजीत घासे, तालुका आरोग्य अधिकारी, अलिबाग
.