संजय बंजारा यांचा तरूणांना संदेश
। पनवेल । वार्ताहर ।
केवळ एक टक्का वेगळा विचार केल्यास शंभर टक्के आयुष्य बदलू शकते हा अनुभव स्वतः घेवून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणांमध्येही जगण्याची उमेद जागविण्याचा प्रयत्न संजय बंजारा याने सुरु ठेवला आहे. यासाठी तो सायकलवरुन भारतभ्रमण करत ठिकठिकाणी जावून आपला अनुभव सांगत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद झाले, अनेकांचे रोजगार गेले आणि नैराश्येतून तरुण आत्महत्येकडे वळू लागल्याचे विदारक चित्र दिसू लागले. परंतु आत्महत्या हा यावर उपाय नाही असा संदेश संजय बंजारा हा युवक देत आहे. लॉकडाऊनमुळे त्याचा हॉटेल व्यवसाय ठप्प झाला. कर्जाचा डोंगर वाढू लागला त्यामुळे तोही नैराश्यात गेला आणि आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यात घोंगावू लागला, त्याने तसा प्रयत्नही केला पण तो यशस्वी झाला नाही. नंतर त्याला कुणीतरी सांगितले की, आत्महत्येचा विचार सोडून दे जरा वेगळा विचार कर आणि सायकल चालविण्यास सुरूवात कर, तुझ्या विचारात नक्की बदल होईल. हताश झालेल्या संजय बंजारा याने शेवटचा उपाय करुन बघू या उद्देशाने सायकल चालविण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या विचारात सकारात्मक बदल झाला. ज्या सायकल चालविण्यामुळे आपले विचार बदलले त्याच सायकल वरुन त्याने भारतभर भ्रमण करुन तरुणांनी आत्महत्या करु नये, आत्महत्या हा पर्याय नाही असा संदेश देण्याचे ठरवले व 30 ऑगस्ट रोजी त्याने भारतभ्रमण करण्यास सुरुवात केली.
बंगालवरुन आसाम, मेघालय, उत्तरप्रदेश, वैष्णोदेवी, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात असा प्रवास करत तो तेराव्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात भ्रमण करत आहे. महाराष्ट्रातून ते कोल्हापूर मार्ग गोवा आणि दक्षिणेकडील राज्यात संदेश देण्यासाठी भ्रमण करणार आहे. या प्रवासात त्याला अनेक अनुभव आले. काही ठिकाणी कोरोनाचे संकट असल्याकारणाने त्याला येण्यास मज्जाव करण्यात आला वेळप्रसंगी मारहाणही झाली. परंतु त्याने आपला निश्चय सोडला नाही आणि तो प्रवास करीतच राहिला.
मदतीची गरज
घरातून केवळ 2500 रुपये घेवून प्रवासास निघालेल्या संजय बंजारा यास आतापर्यंत नाष्टा, जेवणाची सोय कोण ना कोण करत आहे. पण आता महाराष्ट्र सोडल्यानंतर मात्र त्याच्याकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे पुढचा प्रवास त्याचा खडतर असणार आहे. त्यासाठी त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे 9332579693 असा त्याचा संपर्क क्रमांक असून महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिण भारतात ज्यांचा चांगला संपर्क आहे, त्यांनी त्याच्या क्रमांकावर संपर्क साधून त्याला आवश्यक ती मदत करावी.