| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मराठी भाषेच्या अभिजात दर्जा बहाल करण्याबाबत सध्या आंतरमंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं केंद्र सरकारकडून गुरुवारी राज्यसभेत सांगण्यात आले. सातत्यानं महाराष्ट्र सरकारनं यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार असल्याने तमाम मराठीजनांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
यासंदर्भात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी राज्यसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी उत्तर देताना सांगितलं की, लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर सध्या आंतरमंत्रालयीन विचारविनिमिय सुरु आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय समोर येईल. केंद्राकडून सध्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.