तीन महिन्यांपासून मानधन रखडले
कुटुंबावर उपासमारीची वेळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना विरोधातील लढाईत मोठा सहभाग असणार्या आशा सेविकांचे मागील तीन महिन्यांपासूनचे मानधन रखडल्याने जिल्ह्यातील आशा सेविकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे मानधन अजूनही मिळालेेले नसल्याने आशा सेविकांमध्ये नाराजी पसरली आहे. सॉफ्टवेअरमुळे सदर मानधन रखडले असल्याचे सांगण्यात येते. आधीच अत्यल्प असलेले मानधन, तेही जर तीन-तीन महिने मिळत नसेल तर आशा सेविकांनी जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
आशा सेविका म्हणून काम करणार्या महिलांमध्ये अनेकजणांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. काही विधवा, परित्यक्ता अशा महिलादेखील आशा सेविकेचे कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टरदेखील कोरोना काळात रुग्णांजवळ जाण्यास तयार नव्हते, त्यावेळी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका आघाडीवर जाऊन गावोगावी कोरोनाचे सर्व्हेक्षणाचे काम करत होते. कोरोना निर्मूलनात आशा सेविकांचे मोठे योगदान आहे. हेच काम करताना अलिबाग तालुक्यातील एका आशा सेविकाला आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यांना या कामाच्या बदल्यात अत्यंत तुटपुंजे मानधन शासनाकडून दिले जाते. मात्र, तेही वेळेवर मिळत नसल्याने मोठ्या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते. अलिबाग तालुक्यात 96 आशा सेविका कार्यरत आहेत. तर संपूर्ण जिह्यात 2 हजार 300 आशा सेविका आपले कर्तव्य बजावत असतात. कोरोनाच्या सोबतच सर्व लसीकरण, इतर उपाययोजना अशा आरोग्याबाबत महत्वपूर्ण जबाबदार्या आशाताई पार पाडत असतात. ग्रामीण भागातील आरोग्याच्या दूत म्हणून त्या कार्यरत आहेत. अशा वेळी ग्रँण्ड नाही, सॉफ्टवेअरची समस्या अशा कारणांमुळे वारंवार त्यांना उशिराने मानधन मिळत असते. तरीदेखील आशा ताई मोठ्या इमानेइतबारे आपली सेवा देत असतात. सर्व्हेक्षणाबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील त्यांना काम करावे लागते. प्रत्येक घरोघरी भेटी देऊन सर्व्हेक्षण करावे लागते. मात्र काम करुन देखील वेळेवर मानधन मिळणार नसेल तर काय करणार असा प्रश्न आशाताईंना पडला आहे. त्यात अनेक कागदपत्रांच्या झेरॉक्स, प्रवासखर्चदेखील स्वतःच्या पदरचा करावा लागतो. कोव्हीडसाठी पूर्वी दिले जाणारे मानधनदेखील आता दिले जात नाही. त्यामुळे जर लसीकरण झाले, तरच मानधन मिळते अन्यथा रजिस्टर आणि बैठका यांच्यावरच मानधन मिळते, ते फार अत्यल्प असते. त्यामुळे आशा सेविकांच्या कामाचा विचार करुन त्यांना प्रत्येक महिन्यात वेळच्या वेळी मानधन शासनाने नियमितपणे द्यावे अशी मागणी होत आहे.
आरोग्याच्या दूत दुर्लक्षित
ग्रामीण भागातील आरोग्याच्या दूत म्हणून त्या कार्यरत आहेत. अशा वेळी ग्रँण्ड नाही, सॉफ्टवेअरची समस्या अशा कारणांमुळे वारंवार त्यांना उशिराने मानधन मिळत असते. तरीदेखील आशाताई मोठ्या इमानेइतबारे आपली सेवा देत असतात. सर्व्हेक्षणाबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील त्यांना काम करावे लागते. प्रत्येक घरोघरी भेटी देऊन सर्व्हेक्षण करावे लागते. मात्र, काम करुन देखील वेळेवर मानधन मिळणार नसेल तर काय करणार, असा प्रश्न आशाताईंना पडला आहे.
कार्यरत आशा सेविका
अलिबाग तालुका 96
संपूर्ण जिल्ह्यात 2,300