। कल्याण । वार्ताहर ।
थकीत वीजबिल भरण्यास सांगितल्याच्या रागातून मायलेकीने महिला वीज कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना महावितरणच्या नालासोपारा पश्चिम उपविभागात घडली. यासंदर्भात नालासोपारा पोलिस ठाण्यात मायलेकीविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना अशोक जाधव व स्नेहा विपूल मिसाळ (राहणार ए-303, वेदभद्रा अपार्टमेंट, वाघेश्वरी हिल्सच्या मागे, नालासोपारा पश्चिम) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकींची नावे आहेत. प्रगती ढोके या महावितरणच्या नालासोपारा पश्चिम उपविभागात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त यादीनुसार मंगळवारी (8 फेब्रुवारी) दुपारी त्या व त्यांचे सहकारी वेदभद्रा अपार्टमेंट येथील वीजबिल थकबाकीदार ग्राहकांना वीजबिल भरण्याबाबत विनंती करत होते. प्रगती ढोके यांनी कल्पना जाधव यांना वीजबिल थकबाकीची कल्पना देऊन ते भरण्याची विनंती केली. त्यानंतर त्या इतर थकबाकीदार ग्राहकांकडे जात असताना जाधव व मिसाळ या मायलेकीने महिला कर्मचारी ढोके यांना शिवागाळ व धक्काबुक्की करत खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासंदर्भात ढोके यांच्या फिर्यादीवरून नालासोपारा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.