। वर्धा । प्रतिनिधी ।
एकतर्फी प्रेमातून दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन गुरुवारी (दि.10) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (दि.9) पूर्ण झाली होती. त्यानंतर अंतिम निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
न्यायालयाने गुरुवारी आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 3 फेब्रुवारी 2019 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. पण या दोन वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचे क्रौर्य पाहून त्याला 2 वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला 5 हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.