। उरण । वार्ताहर ।
वशेणीतील समीर रामकृष्ण गावंड व कुंजवी रामकृष्ण गावंड यांच्या राहत्या घराला रविवारी ( दि20) संध्याकाळी आग लागण्याची घटना घडली.सदर आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी केल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गावंड यांचे कुटुंबीय हे नवीन शेवा गावातील नातेवाईक मंडळींकडे लग्न समारंभासाठी गेले होते. तसेच रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने घरातील आजी ही गावात असणार्या हरिपाठ कार्यक्रमास आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेर पडली होती. संध्याकाळी 7-15 च्या सुमारास राहत्या घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडण्याचे भयानक चित्र गावकर्यांनी पाहीले. यावेळी भयभीत झालेल्या गावकर्यांनी एकच आरडाओरड करत सदर आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना व रामकृष्ण गावंड कुटूंबियांना दिली. आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. सर्व प्रथम घरातील तिन सिलिंडर घराबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. परंतु सदर आगीच्या भक्ष्यस्थानी गावंड कुटूंबियांच्या घरातील मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जीवनावश्यक वस्तू, कपडे जळून नष्ट झाले आहेत.