। पतियाळा । वृत्तसंस्था ।
हरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
क्रिशनला उत्तराखंडच्या अनू कुमारने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण क्रिशनने आपला वेग आणि कामगिरीत सातत्य राखत 1 मिनिट 50.12 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या हरयाणाच्या मनजित सिंगला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या आदेश यादव याला पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकावर ममाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशच्या कार्तिक कुमारने 14 मिनिटे 42.76 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
हरमिलन हिला राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. एम. आर. पूवाम्मा हिला पहिल्याच फेरीत मागे टाकल्यानंतर हरमिलनने दिल्लीच्या शालू चौधरी आणि चंदा यांच्यावर सरशी साधत सुवर्णपदक मिळवले. चंदा हिने रौप्य तर श्रीलंकेच्या निमाली लियानाराची हिने कांस्यपदक जिंकले.
तिहेरी उडीमध्ये एडहोस पॉल, कार्तिक उन्नीकृष्णन आणि अब्दुल्ला अबूबेकर यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर पॉलने 16.58 मीटर उडी मारत सुवर्णपदक मिळवले. फेडरेशन चषकात सुवर्णपदक मिळवणार्या उन्नीकृष्णन याने पाचव्या प्रयत्नांत 16.54 मीटर उडी मारत रौप्यपदक प्राप्त केले. अब्दुल्लाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनू कुमारी हिने महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात 5004 गुणांची कमाई करत सुवर्णपदक जिंकले.