| मुंबई | प्रतिनिधी |
बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटवरुन पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट्द्वारे म्हटलं आहे. तसेच, नाना पटोले यांनी ट्वीट सोबत फोन टॅपिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या काय सूचना आहेत, हे देखील एका माहितीपत्रकाद्वारे आपल्या ट्वीटमध्ये दर्शवलं आहे.