डॉ.विश्वास चव्हाण यांचे प्रतिपादन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे. ग्लोबल युगात या निजभाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी निजभाषिकांचा पुढाकार आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी केले आहे. मराठी गौरव भाषा दिनानिमित्त मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीशैल भैरगुंडे, ग्रंथपाल गजानन मुनेश्वर, डॉ. मधुकर वेदपाठक, डॉ.मुरलीधर गायकवाड, डॉ.देविदास रौदळ, डॉ.सीमा नाहिद आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. चव्हाण म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी निजभाषिकांनी प्रत्यक्ष व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावी वापर करणे, आवश्यक आहे. या महाराष्ट्र भूमीत जन्माला येणार्या प्रत्येकाला ही भाषा जन्मापासून संस्कारीत करीत असते. मराठी मने आजही ओव्यांपासून अभंगापर्यंत आणि लोकगीतांपासून काव्यांपर्यंत मोहीत होत असतात. आपल्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी, मराठीच्या सुपूत्रांनो तुम्ही आग्रही व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.वेदपाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वजन केल्यानंतर, कवीवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले. तद्नंतर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. भैरगुंडे यांनी साहित्यिकांची परंपरा आणि मराठी भाषेतील योगदान अधोरेखित केले. तसेच प्रत्येक मराठी भाषिकांनी आपले मत मराठीमधूनच अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले.