जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 1 मार्च रोजी कोरोनाच्या 13 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज देखील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. 10 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 2, पनवेल ग्रामीण 6, उरण 1, खालापूर 1, अलिबाग 2, श्रीवर्धन 1 असे 13 रुग्ण आढळले. कर्जत, पेण, माणगाव, रोहा, म्हसळा मुरुड, सुधागड, तळा, महाड व पोलादपूर या 10 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 529 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 590 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा सुदैवाने 4 हजार 692 वरच थांबला आहे. सद्यस्थितीत 247 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.






