पाणीसंकट टळल्याने होळी उत्सवात ग्रामस्थांची दिवाळी
| माणगाव | वार्ताहर |
पहूर धरणाचे पाणी काळनदी पात्रात सोडल्याने निजामपूरला पाणी पोहोचले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही निजामपूर पाणीटंचाईतून मुक्त झाले आहे. त्यामुळे ऐन होळी उत्सवात ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. पाटबंधारा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी खा. सुनील तटकरे यांनी संपर्क साधून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. निजामपूर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्या कोशिंबळे नदीवरील बंधार्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने हा बंधारा दिवसेंदिवस कोरडा पडू लागला, त्यामुळे या बंधा-याच्या पाण्यावर अवलंबून असणार्या निजांमपूरसह चार महसूल गावे व 27 वाड्यांतील सुमारे सोळा हजार नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईशी सामना करावा लागू नये यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून निजामपूर ग्रा.पं. सदस्य राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रसाद गुरव, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी खा. सुनील तटकरे यांची भेट घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला होता.