महातवितरणचे संचालक रेशमे यांचे प्रतिपादन
| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणाने स्थापनेपासून विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत पुढे वाटचाल केली आहे. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे. वीज ग्राहकांना उत्तम सेवा देणे आणि या दिलेल्या सेवेचे मोल वेळेवर मिळवणे हाच महावितरणचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी वरिष्ठ स्तरापासून ते फिल्डवर काम करणारे कर्मचारी सातत्याने काम करत आहेत, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी केले.
संचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी कल्याण परिमंडलाला नुकतीच भेट दिली. यानिमित्त त्यांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सत्काराच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते विजय मोरे, संदीप पाटील, किशोर उके, दीपक पाटील, दिलिप भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक (प्रकल्प) रेशमे म्हणाले, महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा 40 ते 45 टक्के वाटा आहे. त्यामुळे या विभागाच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, कार्यकारी अभियंते नरेंद्र धवड, दिगंबर राठोड, धनराज बिक्कड, प्रवीण चकोले यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक महाव्यवस्थापक गायकवाड यांनी केले. कार्यकारी अभियंता बिक्कड यांनी आभार मानले.