अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात
। पनवेल । वार्ताहर ।
मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार (स्टील मार्केट) कात टाकणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्ते नेहमीच वाहतूकदारासाठी डोकेदुखी ठरत आली असताना, समितीच्या मार्फत व्यापार्यांच्या सहयोगाने दहा महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
दि.21 रोजी या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे वाहन चालक वाहतूकदार आणि व्यापारी तसेच ग्राहकांची गैरसोय टाळणार आहे. सिडकोने या स्टील मार्केटचे नियोजन तर केले, मात्र अंतर्गत सोयी-सुविधा पुरविताना पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने स्टील मार्केटला अद्याप काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकीच अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था ही महत्त्वाची समस्या समजली जाते. बाजार समितीने याकरिता पुढाकार घेतला आहे. याकामी एकूण खर्च 11 कोटी 75 लाख इतका आहे. दहा रस्त्यांची लांबी 2354 मीटर इतकी आहे. तर हे रस्ते 15 मीटर रुंदीचे आहेत. सदर रस्त्यांचे काम हे मेसर्स जे एम म्हात्रे इंन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आलेले आहे.
या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचे कार्यकारी अधिकारी ए.के. श्रीवास्तव, गुलाबराव जगताप, राजीव खंडेलवाल, विजय कुमार झा, प्रल्हाद प्रजापती, संजय पाटील, किशोर चौधरी, संजय भुगे, प्रशांत पारेख, अजितकुमार जैन आदींसह बाजार समितीचे इतर अधिकारी सभासद उपस्थित होते.