पादचारी पुलाच्या दुरुस्तीवेळी उपाययोजना नाहीत
। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेकडील शेलू या रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. मात्र, त्या कामासाठी मध्य रेल्वेकडून स्थानकातील प्रवाशांची कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी प्रवासी दिनेश कालेकर यांनी स्थानक प्रबंधक यांना भेटून केली आहे.
शेलू या मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत एन्डकडील रेल्वे स्थानकात 2021 मध्ये मध्य रेल्वेकडून नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली असून, या स्थानकात प्रवाशांना पादचारी पुलावर नेण्यासाठी उभारण्यात येणार लिफ्टचे कामदेखील अंतिम टप्यात आहे. तर, जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती गेली काही दिवसांपासून सुरू आहे. या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम मध्य रेल्वेकडून सुरू असताना, त्या पुलाचे सिमेंटच्या पायर्या काढून टाकल्या जात आहेत. त्या पायर्यांवर असलेले सिमेंट हे थेट स्थानकात पडत आहे. त्यावेळी तेथे प्रवाशांना सिमेंट अंगावर पडेल किंवा दुरुस्तीचे काम सुरू आहे याबाबत कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक रेल्वेकडून लावण्यात आले नाही. त्यामुळे स्थानकात लोकल पकडण्यासाठी धावत अचानक पोहचणारे काही प्रवाशांच्या अंगावर पादचारी पुलाचे सिमेंट पडत आहे.
शेलू रेल्वे स्थानकात हे सर्व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्याबाबत दिनेश कालेकर यांनी शेलू रेल्वे स्थानकातील स्थानक प्रबंधक यांची भेट घेतली आणि सूचना फलक लावण्याची आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रवाशांना काही दुखापत होऊ नये यासाठी सुरक्षाविषयक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.






