। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डॉक्टर दिनीच वडखळ जवळील पाबळ येथून वडखळ पोलिसांनी एका संशयित बोगस डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत वडखळ जवळील पाबळ आदिवासी विभागात एक बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानूसार गुरुवारी पाबळ येथे तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर यांच्या बरोबर उपनिरीक्षक मडके, हवालदार रुईकर, दिनेश भोईर, अमोल म्हात्रे यांनी धाड टाकून संशयित बोगस डॉक्टर एकनाथ मोकल (रा.आमटेम,ता.पेण) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच डॉक्टरवर 2013 मध्ये देखील अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई केली होती.
त्या बाबत न्यायालयात केस सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. श्री कृपा दवाखाना पाबळ येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आक्षेपार्ह औषधे, इंजेक्शन्स आढळून आले. त्यांची डिग्री ही संशयास्पद असून संशयास्पद डॉक्टर एकनाथ मोकल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभारयांनी दिली.