52 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बँक नोकरीसाठी चाचणी पेपर, ट्रेनिंग व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता महाविद्यालयातील 42, तर जिल्हाभरातून नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रा.डॉ. मेहबुब नगरबावडी, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, आयएफबीआय/ एनआयआयटी/आयसीआयसीआय बँकेचे विभागीय अधिकारी निरंजन मोहिते, समन्वयक मितेश अहेर, डॉ. मुरलीधर गायकवाड, संदेश दांडेकर, सहाय्यक शाखाप्रमुख आशिष राऊत, ग्रंथपाल गजानन मुनेश्वर, मोहित हसवारे, श्रीकांत पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ. मेहबुब नगरबावडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की व्यवसाय व नोकरीच्या विविध संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चालून आलेल्या संधीतून आपले कौशल्य सादर करुन आपले करिअर घडवा. आयएफबीआय/एनआयआयटी/आयसीआयसीआय बँकेचे विभागीय अधिकारी निरंजन मोहीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बँकिंग व विमाक्षेत्रातील रोजगारांच्या विविध संधी आमच्या आयसीआयसीआय बँकेमार्फत मिळणार आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यांचे ऑफलाईन चाचणी पेपर घेतले जातील. त्यानंतर बौद्धिक चाचणी, मुलाखती व क्षमता चाचणी त्यानंतर त्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 45 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामधून नोकरीची संधी प्राप्त होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मुरलीधर गायकवाड यांनी केले.