क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा भरणा; अलिबाग कारागृहातील कैद्यांची क्षमता 211 टक्यांवर
। अलिबाग ।
राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, ते प्रमाण तब्बल 135 टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील 60 कारागृहांची क्षमता 24 हजार 722 कैद्यांची असून सध्या या कारागृहांमध्ये 33 हजार 428 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत.
जून 2021 मधील आकडेवारीनूसार राज्यातील कारागृहांची दयनीय अवस्था झाली असल्याचे समोर येते. बाहेर जाणार्यांच्या तुलनेत येणार्या कैद्यांची संख्या दररोज वाढतच असल्याने कारागृहांच्या क्षमतेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जवळपास सर्वच कारागृहे सुपरडुपर हाऊसफुल्ल झाली असून त्याचा प्रचंड ताण कारागृह प्रशासनावर पडत आहे. याला वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती गंभीर होईल. तेव्हा यावर लवकरात लवकर उपाययोजना करा अशी ओरड राज्यातील सर्वच कारागृह अधीक्षकांची असल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत, तर जिल्हा कारागृह 28, विशेष कारागृह 1, किशोर सुधारलय 1, महिला कारागृह 1, खुले कारागृह 19, खुली वसाहत 1 अशी एकूण 60 कारागृहे आहेत. जून 2021 मधील संख्येनुसार, राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेच्या 135 टक्के कैदी बदी आहेत. अलिबाग कारागृहात तर हे प्रमाण 211 टक्क्यांवर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांची घूसमट होत असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
कैद्यांना ठेवायचे कुठे, त्यांचा सांभाळ करायचा कसा, प्रत्येक कैद्यावर लक्ष ठेवायचे कसे अशा समस्यांनी कारागृहातील अधिकारी-कर्मचारी भांबावून गेले आहेत. उपलब्ध जागेची क्षमता कधीच संपली असून आता तर कैद्यांना जनावरांसारखे बरॅकमध्ये कोंबण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अलिबागमधील जिल्हा कारागृहात 173 कैदी
अलिबागमधील जिल्हा कारागृहाची क्षमता 82 कैद्यांची असताना प्रत्यक्षात मात्र 173 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये 166 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे. तसेच तळोजा कारागृहाची क्षमता 2124 कैद्यांची असून सध्या या कारागृहात 2629 इतके कैदी आहेत. हे प्रमाण 124 टक्के इतके आहे.
राज्यातील कारागृहे संख्या
मध्यवर्ती कारागृह – 9
जिल्हा कारागृह – 28
विशेष कारागृह – 1
किशोर सुधारालय – 1
खुली कारागृहे – 19
खुली वसाहत – 1
महिला कारागृहे – 1
एकूण – 60 कारागृहे