। माणगाव । प्रतिनिधी ।
कोव्हिड संकटकाळात शासनाचे आदेश असताना शासनाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करून माणगाव बाजारपेठेत विना मास्क फिरताना पोलिसांनी पकडल्यावर दंडात्मक शुल्क भरण्यास नकार दिल्याने दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्हा 1 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास माणगाव मोर्बा नाका येथे घडले. याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याच्या सुप्रिया शिंदे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील दोन आरोपींनी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या आदेशाची अवज्ञा करून तोंडाला मास्क न लावता दिसून आले असून, जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल असे कृत्य करून दंडात्मक कारवाईचे शुल्क भरण्यास नकार दिला.
या गुन्ह्याप्रकरणी दोन्ही आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.आर.सायगवकर हे करीत आहेत.