। नवीन पनवेल । वार्ताहर ।
राम नवमी सणाच्या आयोजनासाठी 50 लाख रुपये जमा करून त्यापैकी केवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च करून 30 ते 35 लाख रुपयांचा परस्पर संगनमत करून अपहार केल्याचा प्रकार फुंडे- बोकडवीरा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री राम देव आणि श्री विठोबा मंदिर फुंडे, बोकडविरा या ट्रस्टचे ट्रस्टी आणि चेअरमन महादेव घरत आहेत. गावातील श्रीराम जन्मोत्सव उत्सव, कमिटी फुंडे 2022 ही नोंदणी नसलेली कमिटी जीवन यादव घरत, शैलेश भास्कर म्हात्रे, प्रथमेश विजय म्हात्रे, संग्राम मुकुंद म्हात्रे, शिवेंद्र शांताराम म्हात्रे, प्रीतम चंद्रकांत म्हात्रे, सागर चंद्रकांत म्हात्रे, मीनाक्षी बाबुराव म्हात्रे, अमर रामचंद्र म्हात्रे यांनी संगनमत करून स्थापन केली व रामनवमी उत्सव निमित्त पोस्टर, बॅनर छापून गावातील रहिवासी, व्यावसायिक दुकानदार, यांच्याकडून देणगी पावती, जीपे, तसेच इतर माध्यमातून रोख व ऑनलाईन रकमेची देणगी स्वीकारली व या रकमेचा स्वतःच्या फायद्याकरता वापर करून फसवणूक केली आहे. गावातील ट्रस्ट व संस्थानांना विश्वासात न घेता आणि धर्मादाय आयुक्त व कोणत्याही सरकारी खात्याची परवानगी न घेता बोगस कमिटी स्थापन केली व लोकांकडून, उद्योगपती, दुकानदारकडून आणि कंपन्यांकडून रामनवमी उत्सवासाठी लोकांकडून जवळपास 50 लाखांची देणगी गोळा करून त्यापैकी 10 ते 15 लाख रुपये खर्च केले आणि 30 ते 35 लाखांचा परस्पर संगनमत करून अपहार केला. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.