नागरिकांनीही घरातच बसने केले पसंत
। मुरूड । वार्ताहर ।
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 20 ते 25 एप्रिल पर्यंत हवामान ढगाळ राहील व उष्णता वाढेल या अंदाजानुसार मुरुडकरांन उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला. याच महिन्यात दुसर्या उष्णतेच्या लाटेचा अनुभव मुरुडकरांना आला. आज तिसर्या दिवशी दुपारी 1 च्या सुमारास मुरुडचा पारा 38.4ओ अंशावर गेला. त्यामुळे मुरुड करांनी घरातच बसने पसंत केल्याने मुरुड मध्ये क्लॅयमेट लॉकडाऊन पहावयास मिळाला. याच महिन्यात उष्णतेची लाट आली होती त्यावेळी मुरुडचा पारा 40ओ वर गेला होता.
मुरुडमध्ये आदल्या दिवशी 24 एप्रिल रोजी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुड मधील तापमान काही अंशाने कमी झालेले पहावयास मिळाले. दुसर्या दिवशी 25 एप्रिल रोजी वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली. दुपारपर्यंत मुरुड चांगलेच तापले होते. त्यामुळे मुरुडच्या नागरिकांनी घरातच बसून राहणे पसंत केले. काही महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे मुरुड शहरात लॉकडाऊन पुन्हा सुरू झाले की काय असे वाटू लागले.
दुपारच्या सुमारास मुरुड बाजारपेठ शांत शांत असल्याचा अनुभव आला. मुरूड समुद्र किनारी शुकशुकाट झालेले दिसत होते. संपुर्ण शहरात तुरळक वर्दळ पाहिल्यास मिळत होती. या उष्णतेमुळे शहरी जनजीवन विस्कळित झाले होते. मुरूड शहर हे नारळी, पोफळीच्या बागेत वसलेले असल्यामुळे शहाराचे तापमान बाहेरील तापमानाच्या 1 ते 2 अंशाने कमी असते. त्यामुळे मुरुड शहरातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.







