। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक नामांकित कृषी विद्यापीठ असून कोकणातील शेतीचा मानबिंदू म्हणून सर्वत्र ओळख आहे. या विद्यापीठाची स्थापना कोकणचे सुपुत्र तत्कालीन कृषि मंत्री कै. डॉ. पी. के. तथा बाळासाहेब सावंत यांच्या प्रेरणेने 18 मे 1972 रोजी झाली. सन 2021-22 हे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून गेल्या 50 वर्षात विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोकणातील शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार अधिक प्रभावीरित्या व्हावा, या उद्देशाने दि. 13 ते 17 मे, 2022 या कालावधीत मसुवर्णपालवीफ या नावीन्यपूर्ण कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकर्यांना विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबरोबरच इतर संस्थांनी केलेले कार्य, कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यादृष्टीने महाराष्ट्रातील इतर तीन कृषि विद्यापीठे, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व इतर संलग्न विकास विभाग तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी कंपन्या, निमशासकीय संस्था, महामंडळे, बँका, बचत गट इत्यादी या कृषि महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची ओळख होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परिसंवाद, चर्चासत्रे, शिवार फेरी प्रशिक्षण, खाद्य पदार्थ स्पर्धा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महोत्सवाला कोकणातील तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील लाखो शेतकरी भेट देतील अशा प्रकारचे नियोजन केले आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कृषि मंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच कोकणातील पाचही जिल्हयाचे पालकमंत्री तसेच इतर मान्यवरांना या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.