। उरण । वार्ताहर ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाच्या इशार्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून उरण पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकार्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.
राज्यभरात सध्या भोग्यांवरुन राजकारण सुरू झाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याविरोधातील आक्रमक भूमिकेनंतर समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी उरण पोलिसांनीही खबरदारीची उपाययोजना म्हणून मनसेच्या चार पदाधिकार्यांवर बुधवारी (दि.4) प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अल्पेश कडू, रायगड उप-जिल्हा संघटक सतीश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर,मनसेचे उरण तालुका संघटक रितेश पाटील यांना ताब्यात घेण्यात आले, असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.