रस्त्यात सापडलेले दागिने केले परत
। उरण । वार्ताहर ।
रस्त्यात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र,रोख 10 हजार आणि मोबाईल परत करुन भंगार गोळा करणार्या उरणमधील दोन युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांची अॅक्टिव्हा मोटार सायकल घेऊन ते करंजा कासवले पाडा ते नाखवा हॉस्पिटल, कोटनाका येथे जात असताना त्यांच्या जवळ असलेल्या काळया रंगाच्या पर्स मध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल फोन व मुलीच्या औषधोपचारा करीता पैसे कमी पडत असल्याने सोनाराकडे गहाण ठेवण्याकरीता सोबत ठेवलेले साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र असे आनंदी हॉटेल जवळ आले असता रस्त्यात पडून गहाळ झाले.
ही पर्स परत मिळावी या करिता तक्रार देण्यासाठी त्या उरण पोलीस ठाणे येथे आल्या. त्यावेळी उरण पोलीस ठाणे येथे रस्त्यावर भंगार व कचरा गोळा करणारे अश्रफ असगर शेख वय 18 वर्ष व अमित लालजी चौधरी, वय 23 वर्ष दोन्ही रा.बोरी पाखाडी हे उरण पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आंनदी हॉटेल जवळील पेट्रोल पंपसमोरील रस्त्यावर सापडलेली काळया रंगाची पर्स व त्यात असलेले सोन्याचे मंगळसूत्र, 10 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन मुळ मालकाला परत मिळावा या करिता त्यांना मिळालेली पर्स ते जमा करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले.
यावेळी त्यांनी जमा केलेली पर्स सुशाली नाखवा यांना दाखवून व खात्री करून या प्रकरणी पोलीस ठाण्यात आलेल्या अश्रफ असगर शेख व अमित लालजी चौधरी यांना सुशाली नाखवा यांच्या समोर हजर केले. या दोघांनी प्रामाणिकपणे रस्त्यावर सापडलेली काळया रंगाची पर्स व त्यातील 10 हजार रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल फोन व साडे तीन तोळ सोन्याचे मंगळसुत्र हे सुशाली धनंजय नाखवा यांना परत करुन उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करत माणुसकीचे दर्शन घडविले.त्याबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या टीम ने अश्रफ असगर शेख, अमित लालजी चौधरी यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कौतुक केले.