स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई;पाच कोटीचा मुद्देमाल जप्त
। अलिबाग । भारत रांजणकर ।
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अलिबागच्या इसमाला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच आज माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटारसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्या इसमाला जेरबंद केले आहे. या इसमाकडून पाच किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपय किंमतीचे उलटीसह मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.
रत्नागिरी येथून एक जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी रायगडात येणार असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक अशोक दुधे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक महेश कदम यांनी तेथे मोटारसायकल वरुन आलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 किलो वजनाची उलटी जप्त केली. याची किंमत पाच कोटी आहे. यासंबंधी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
यासाठी होते उलटीची तस्करी
व्हेल माशाची उलटी उर्फ समुद्रात तरंगते सोने हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो. याचा वापर अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच, खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. याची खरेदी-विक्री हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. शासनाची बंदी असूनही काही जण याची मोठ्या प्रमाणात तस्करी करताना दिसून येत आहेत.
व्हेल माशाच्या उलटीची जागतीक औषध बाजारात मोठी मागणी असुन किंमत देखिल अधिक आहे. व्हेल माशाने केलेली उलटी बाजारात तस्करीसाठी घेऊन जात असताना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरीतील दापोली येथून व्हेल माशाची उलटी बाजारात तस्करीसाठी येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना समजली. त्यांच्या मार्गदनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे सापळा रचला. यावेळी एका सिल्व्हर रंगाच्या स्कूटीवरून आलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याच्याकडून पाच किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आली. भारतीय बाजारपेठेत या उलटीची किंमत पाच कोटी रूपये इतकी आह; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अंदाजे वीस कोटी रूपये किंमत असल्याचे बोलले जाते. सुगंधीत अत्तर बनविण्यासाठी या उलटीला मोठी मागणी असते. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी कालांतराने दगडासारखी बनते. यामध्ये आम्ब्रीन, म्ब्रोक्झीन, म्ब्रोनॉल ही रसायने असतात.
– महेश कदम, पोलीस उप निरिक्षक