। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली वसाहतीत सर्वसामान्यांना वेगळ्या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर हक्काची जागा असावी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपाचे सभागृह उभारण्यात येणार आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही वास्तू साकारण्यात येणार आहे. सेक्टर 11 येथे उभारण्यात येणार्या वास्तूचा संकल्पीय आराखडा तयार झाला असून, प्रशासकीय मान्यतेसाठी सभागृहासमोर येत्या 24 मे रोजी ठेवण्यात येणार आहे. माजी महिला बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी याकरिता विशेष पाठपुरावा केला होता.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महासभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सिडकोकडून हा भूखंड घेण्यात आला असून, त्यासाठी एक कोटी 19 लाख नऊ हजार 682 रुपये प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्याचा संकल्प आराखडा आणि नकाशे तयार करण्यात आले असून, ते महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.







