। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणार्या पावसाने रायगड जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील 2 दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. पेरणीच्या कामानंतर आता लावणीच्या कामाला जोर येणार आहे.
रायगड जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडला. गेल्या 24 तासात सरासरी 65.85 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जुनपासून आज अखेर एकूण सरासरी 357.22 मि.मी. पर्जन्मानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंदीनुसार तळा येथे सर्वाधिक 146 मिमी, श्रीवर्धनमध्ये 144 तर अलिबाग येथे 131 अशी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. तर पेणमध्ये 36, मुरुड 96, पनवेल 7.60, उरण 70, कर्जत 21.60, खालापूर 16, माणगाव 64, रोहा 37, सुधागड 80, महाड 30, पोलादपूर 35, म्हसळा 95, माथेरान 44.40 मि.मी अशी पावसाची नोंद झाली आहे. आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 53.60 मि.मी इतके असून एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 12.16 टक्के आहे.