। नेरळ । वार्ताहर |
माथेरान या झाडांनी वेढलेल्या शहरात विजेच्या तारा यांच्या झाडे कोसळून घोड्यांना नेहमी अपघात होत होते. मात्र महावितरणकडून माथेरानमधील सर्व वीज वाहिन्या भूमिगत केल्याने तो धोका कमी झाला आहे. पण माथेरान शहरात असंख्य ठिकाणी असलेल्या वीज रोहित्र हे आजही उघडे आहेत. दरम्यान, त्या उघड्या वीज रोहित्र यांना घोडे आणि अन्य जनावरे हे टेकायला जातात आणि वीज प्रवाहाचा झटका बसून जनावरे दगावतात. माथेरान आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून त्याबाबत सूचना आल्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ शहरातील सर्व वीज रोहित्र यांना नव्याने झाकणे लावून त्या बंदिस्त केल्या आहेत.
त्याबाबत संतोष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वीज रोहित्र यांना बंदिस्त करण्याची सूचना केली होती.त्यानंतर महावितरण विभागाने तात्काळ कार्यवाही करताना माथेरान शहरातील विविध भागात असलेल्या वीज रोहित्र यांची पाहणी केली आणि ज्या ठिकाणी वीज रोहित्र यांचे लोखंडी दरवाजे तुटले आहेत त्यांची दुरुस्ती करून घेतली. श्रीराम चौक, रेल्वे विश्रामगृह, दस्तुरी तसेच शहरातील जंगल भागात असलेल्या महावितरणच्या वीज रोहित्र यांना बंदिस्त करण्यात आले आहे. महावितरणकडून तात्काळ कार्यवाही करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी महावितरणचे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आभार मानले.