रायगड जिल्हा बँक पाली शाखेच्या वतीने मेळावा
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांना बँकांच्या विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाली शाखेच्या वतीने सुधागड तालुक्यातील विविध भागातील महिलांना आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानातून मार्गदर्शन करण्यात आले.
खवली येथील विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बचत योजना, ठेव योजना, विविध कर्ज योजना, बचत गट कर्ज विमा, कृषीविषयी योजना तसेच आर्थिक व्यवहार करत असताना कोणती सुरक्षितता घेतली पाहिजे, याबाबत पाली येथील शाखाधिकारी डी.के. देशमुख, शाखा निरीक्षक नयन नागे व नांदगाव व पाली भागातील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव सुधीर साखरले, प्रशांत जोशी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, महिला सदस्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.