| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून व कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रविवार, दि. 24 जुलै रोजी श्रमदानाच्या माध्यमातून सहाण-एकदंतनगर परिसराची स्वच्छता जन शिक्षण संस्थान रायगड कर्मचार्यांच्या माध्यमातून उत्साहात करण्यात आली. त्याचबरोबर सहाण समिरा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमदेखील घेण्यात आला.
सर्वप्रथम कार्यालयात उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. श्रमदान करून सहाण समिरा परिसरात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छता हीच खरी देश सेवा, असे आवाहन करीत सर्व ग्रामस्थांनी गाव विकासासाठी श्रमदान करावे, असे आवाहन विजय कोकणे यांनी केले.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष गीतांजली ओक, नरेन जाधव, प्रा. अविनाश ओक, अॅड. नीला तुळपुळे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत ‘स्कील से समृद्ध स्वच्छता’ कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, कर्मचारी प्रतीक्षा चव्हाण (अकाऊंट मॅनेजर), सुकन्या नांदगावकर (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), सचिन चव्हाण, स्नेहा म्हात्रे, अजय पाटील, नवनाथ पोईलकर, भरती पोईलकर हे कर्मचारी उपस्थित होते.







