। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी 2) गेल्या काही महीन्यांपासून नियमित वैद्यकीय अधिकार्याच्या प्रतिक्षेत आहे. सध्या गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्यांकडे बोर्लीपंचतन येथील सहाय्यक पशुधन अधिकारी या पदाचा अतिरीक्त कार्यभार असल्याने आठवड्यातील मंगळवार व गुरुवार या दिवशी ते उपस्थित राहून येथील पशूपालकांना सेवा देत आहेत. तालुक्यातील हरेश्वर, सायगाव,दांडगुरी व दिघी या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातही नियमित सहाय्यक पशुधन अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकार्यांवर पशुधनाचा उपचार अवलंबून असल्याने परिसरातील शेतकर्यांच्या गुरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही.
पावसाळ्यात पशुंना मोठ्या प्रमाणात आजारांची लागण होते ग्रामीण भागात पशुवैद्यकाची सुविधा वेळेत उपलब्ध होत नसल्याने परिणामी शेतकर्यांना शेतीची कामे टाकून जनावरांना उपचारासाठी शहराच्या ठिकाणी धावाधाव करावी लागते त्यामुळे पशुपालकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी व संबधित वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन बोर्लीपंचतनसह तालुक्यातील इतर गावांचीही पशुवैद्यकीय दवाखान्यातील रीक्त पदे भरुन पशुपालकांना नियमित सेवा मिळावी अशी मागणी पशुपालक व शेतकर्यांकडून होत आहे.
बोर्लीपंचतन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नियमित अधिकारी नसल्याने आमच्या पशुधनाला वेळीच शासकीय वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळत नाही.
-संतोष कांबळे, शेतकरी-बोर्लीपंचतन