आता प्रतीक्षा उदघाटनाची
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून लिफ्ट बसविण्यात येत आहे. सहा महिने त्या लिप्टचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. अखेर लिफ्ट बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, ती सुरु कधी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे
नेरळ स्थानकातील पादचारी पुलाला तब्बल 47 पायर्या असल्याने त्या चढताना ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेकडून नेरळ रेल्वे स्थानकात लिफ्ट आणि सरकता जिना बसविण्याची मागणी केली जात होती. याबाबत खा.श्रीरंग बारणे यांच्याकडेदेखीलसंघटनेकडून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यानूसार फलाट दोनवर लिफ्ट यंत्रणा बसविण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र ही यंत्रणा बसविण्याचे काम अगदी संथगतीने सुरू असल्याने कर्जत येथील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मांडणारे पंकज ओसवाल यांनी थेट पाठपुरावा करण्यासाठी मुंबई गाठले. परिणामी, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्ट यंत्रणा बसवून पूर्ण झाली.
आता नेरळ स्थानकातील लिफ्ट प्रत्यक्षात कधी सुरु होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय सरकता जिना बसविण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घ्यावे, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर तसेच राजेश गायकवाड, मिलिंद विरले, आबा पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.