। उरण । वार्ताहर ।
दोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर असलेल्या दर्याचा राजाची समुद्रात जाण्याची प्रतीक्षा आत्ता संपली असून, 1 ऑगस्टपासून मच्छिमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार आहेत. खलाशी आणि मच्छिमार यासाठी तयारीला लागले असून, बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छिमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात मत्स्य खवय्यांसाठी भरपूर ताजी आणि स्वस्त मासे उपलब्ध होणार आहे. मात्र, 120 अश्वशक्तीच्या नौकांना मस्त्य विभागाने डिझेल कोटा देण्यास नकार दिला असल्यामुळे मच्छिमारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा आणि या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधवदेखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. या बंदीच्या दोन महिन्यांत त्यांनी ही आपली कामे पूर्ण केली असून, आत्ता मोठ्या आनंदात, गाणी गात आपल्या होड्या घेऊन सातासमुद्रापलीकडे मच्छिमारीकरिता जाणार आहेत. प्रशासनाकडून 1 जून ते 31 जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला होता. हा बंदीचा कालावधी संपत आला असून, 1 ऑगस्टपासून या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत.
करंजा, मोरा, दिघोडा किनार्यावर दोन महिने शाकारून ठेवलेल्या नौका आत्ता खलाशांनी गजबजून गेल्या आहेत. 10-12 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा सोबत घेऊन मच्छिमार समुद्रात कुच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या बोटी सुरूवातीला ससून डॉक, भाऊचा धक्का येथे जाऊन बोटींमध्ये डिझेल आणि बर्फ भरतील नंतर 1 ऑगस्टपासून ते मच्छिमारीला सुरूवात करतील. पहिल्या वेळेला लवकर म्हणजे 5-6 दिवसांनी ते मच्छी घेऊन किनार्यावर येतील. त्यानंतर 10-12 दिवसांनी त्यांची फेरी होईल, असे बोटीवर जाणार्या खलाशांनी सांगितले.
सोमवारपासून करंजा आणि मोरा बंदरातून शेकडो बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत. शासनाकडून 1 ऑगस्टला मच्छिमार बोटींसाठी डिझेल साठा वितरित केला जाणार आहे. या बोटी कसारा आणि ससून डॉक बंदरात डिझेल भरून रवाना होतील. 120 अश्वशक्तीच्या नौकांना डिझेल कोटा मिळणार नसल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात नुकतेच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि ते यावर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे 120 अश्वशक्तीच्या नौकांनादेखील शासनाच्या कोट्यातून डिझेल मिळणार असल्याचे सांगितले.
हेमंत गौरीकर, मार्तंड नाखवा, मच्छिमार नेते