जितेंद्र जोशी, कार्यालयीन चिटणीस, रोहा
एकेकाळी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका म्हणजे भाताचे कोठार ओळखले जायचे, नुसतेच नाही तर पाठ्यपुस्तकातसुद्धा श्रीवर्धनची रोठा सुपारी आणि रोहा म्हणजे भाताचे कोठार, असा उल्लेख अभ्यासला जायचा. रोह्याचे सांगायचे झाले तर जेवढ्या म्हणून भात गिरण्या सुरू होत्या, त्या सर्वच्या सर्व भरडाईसाठी गोणींनी खचाखच भरलेल्या असायच्या, अगदी रस्त्याच्या बाहेरदेखील थप्पीवर थप्पी लागलेली पहायला मिळायची. तेवढेच शेतकरी आणि त्यांच्या बैलगाड्या पहायला मिळायच्या. शासकीय भात खरेदी-विक्रीसुद्धा जोरात असायची.
जिल्ह्याच्या महसूल खात्याचीसुद्धा चलती होती. 1960 ते 1980च्या दशकापर्यंत समृद्धीच समृद्धीच असली तरी कष्टकरी शेतकर्यांच्या समस्या पाचवीला पूजलेल्या असायच्या. शहरातील व्यापारी मात्र पीकपाणी हातात येण्याअगोदरच रोख रक्कम घेऊन खेडेगावात भटकंती करायचे, एवढी शेतमालाला मागणी होती. मात्र, अतिवृष्टी, पिकांवरील रोगराई, योग्य भाव, नुकसान भरपाई, या समस्या शेतकर्यांना सतावत होत्या.
शेतकरी कामगार पक्षाने संघटनात्मक काम उभारत शेतकर्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू केले. संघटना एवढी मजबूत झाली की राजकीय क्षेत्रात आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच एवढेच नव्हे तर, शहरी भागातदेखील नगरसेवक, नगराध्यक्षपदाचे वर्चस्व दिसू लागले होते. तत्कालीन आमदार स्व. पा.रा. सानप यांच्या नेतृत्वाखाली भाताला योग्य भाव मिळावा म्हणून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा एवढा प्रचंड होता, की जुन्या तहसील कार्यालयात पहिली बैलगाडी तर शेवटची बैलगाडी कोलाड नाक्यावर होती. या घटनेची नोंद तत्कालीन महाराष्ट्र शासनाने घेतली होती, अशी माहिती मिळते. याशिवाय अनेक आंदोलने, मोर्चे, निषेध मोर्चे, उपंषणांचे आयोजन करण्याचे केंद्र बिंदू म्हणून रोहा तालुका आघाडीवर असल्याचे असल्याचे पहायला मिळायचे.
निवडणुकांदरम्यान ज्या प्रचारसभा गाजायच्या, त्याची दखल जिल्ह्यातील अन्य राजकीय मंडळींना घ्यावी लागायची. वैचारिक भूमिका मुद्देसूद मांडणे, हा शे.का.पक्षाचा हातखंडा होता.दि.बा. पाटील, भाई शेटे, पा.रा. सानप, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, रोह्याचे मुस्लिम नेते डबीर, अशा अनेक मान्यवरांनी रोह्यातील सभा गाजवल्या आहेत. यांच्या सभा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब, असेच समीकरण पहायला मिळायचे. नंतरच्या काळात मीनाक्षीताई, जयंतभाई पाटील, पंडित पाटील, स्थानिक पातळीवर व्ही.टी. देशमुख, शंकरराव म्हस्कर यांनी पक्षसंघटनेचे कार्य केले.
दरम्यान, धाटाव एमआयडीसीने बाळसे घेतले होते. मोठ्या प्रमाणात शेतजमिनी उद्योगजकांनी घेतल्या होत्या, नवीन पिढी कारखान्याच्या गेटवर रोजंदारीवर उभी राहताना दिसत होती. उंच उंच धुरांच्या लोंढ्यांशी सिमेंटची जंगले स्पर्धा करताना दिसत होती. पंचवीस ते तीस पोहे तयार करणार्या कारखान्यांची संख्या कमी झाली होती. जे चालू स्थितीत आहेत, ते बाहेरून भात खरेदी करू लागले होते. आणि, भाताचे कोठार म्हणून ख्याती मिळवलेला रोहा तालुका आंतरराष्ट्रीय उत्पादनांची आवक-जावक करण्यात गुंतून गेला होता.