। अलिबाग । वार्ताहर ।
निष्ठावंतांचा पक्ष म्हणून शेकापकडे आजही मोठ्या अभिमानाने पाहिले जाते, असे गौरवौद्गार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी काढले. सत्तेसाठी निष्ठा विकणार्यांनी सत्तांतर घडवून आणल्याचे महाराष्ट्राने अनुभवले. अशावेळी निष्ठावंत पक्ष म्हणून कुणाकडे पाहिले पाहिजे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याउलट शेकापने कधीही आपली निष्ठा सोडली नाही. म्हणूनच अखेरच्या श्वासापर्यंत पक्षाशी,जनतेशी निष्ठावंत राह राज्य विधीमंडळाच्या आवारात ज्येष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही आबांच्या निष्ठेची पावतीच म्हटली पाहिजे. याचा सार्थ अभिमान शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे, असेही ते म्हणाले.
शेकाप संपला, संपला म्हणून अशी हाकाटी पिटणार्यांनी वडखळ येथे उसळलेला लाल बावट्याचा झंझावात बघायला हवा होता त्यावेळी त्यांना शेकापची ताकद दिसून आली असती, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापलाच घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करावेत, तसेच रायगडातील सातही विधानसभा मतदार संघात लालबाबटाच फडकविण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.