हळद व्यापार्याचा मृत्यू
। सांगोला । प्रतिनिधी ।
सांगली येथील हळद व्यापारी पंढरपूर येथे पासपोर्ट काढण्यासाठी कारने जात होते. यावेळी सांगोला तालुक्यातील हातीदनजीक आले असता कुत्रा आडवा आल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये हळद व्यापार्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नासीर अब्दुलरज्जाक ढाकवाला (रा.चांदणी चौक, सांगली) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली.
सरफराज सलीम ढाकवाला (रा. साऊथ शिवाजी नगर, चांदणी चौक, सांगली ता.सांगली) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून मनोज मारुती शिंदे (रा. सांगली) असे जखमीचे नाव आहे.
सरफराज हे हळदीचा व्यवसाय करतात. गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते पंढरपूर येथे पासपोर्ट काढण्यासाठी कारने निघाले. त्यांच्यासोबत कारचालक मनोज शिंदे होते. या अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.