। पनवेल । वार्ताहर ।
खारघर सेक्टर 15 ते 19 परिसरात मलमिश्रित पाणी रस्त्यावर जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मलमिश्रित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सिडकोने खारघर सेक्टर सतरा वास्तुविहार गृहनिर्माण शेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात सेक्टर पंधरा घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन, सेक्टर अठरा आणि एकोणीस परिसरातील सोसायट्यांतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सोसायटीतील मलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास मलनिस्सारण वाहिन्या भरल्यास सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात चाळीस हजारांच्यावर लोकसंख्या आहे.
त्यामुळे रस्त्यावर येत असलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. माजी नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांची भेट घेऊन ही समस्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अजूनही सिडकोकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.