रोहा | जितेंद्र जोशी
रोहा तालुक्यात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. रागाच्या भरात विष्णू देसाई याने सासऱ्याचा खून केला. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासूवरही तलवारीने वार केले. या हल्ल्यात सासूला गंभीर दुखापत झाली असून उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील एकदंत सोसायटीमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासरे दुधाराम हरताजी घांची वय ५० वर्षे यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवर देखील धारदार हत्याराने वार करून सासूला देखील जखमी केले आहे.
रोहा बाजारपेठेतील व्यावसायिक दादूराम बोराणा यांच्या मुलीचा विवाह विष्णू देसाई रा सेवादल आळी रोहा हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.पण विष्णू देसाई याची पत्नी लग्नाच्या वर्षभरानंतर त्याला सोडून गेली होती.आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या लोकांनीच गायब केल्याचा संशय विष्णू देसाई याला होता.माझी बायको कुठे आहे याचा जाब विचारण्यासाठी आरोपी मयताच्या घरी गेला होता.पण आम्हाला तुझ्या बायकोबद्दल माहित नाही. असे त्याला वारंवार सांगण्यात येत होते.यासर्व गोष्टींचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास आरोपी तलवार व अन्य धारदार हत्यारासह आपल्या सासऱ्याच्या घरी जाऊन माझी बायको कुठे आहे असे विचारू लागला.परंतु आम्हाला तिच्या बद्दल काही माहीत नाही असे सासऱ्याने सांगितल्याने आरोपी याने धारदार शस्त्राने सासऱ्यावर वार केले.त्यानंतर सासऱ्याला जिन्यावरून फरफटत नेऊन बिल्डिंगच्या खाली देखील नेऊन वार केले.संपूर्ण परिसरात रक्ताचे थारोळे पसरले होते.पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवर देखील जावयाने वार केल्याने ती देखील गंभीर जखमी झाली असून रोहा उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.सदर घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपी विष्णू देसाई याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.फोटो १) उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे उपस्थित मयताच्या बाजूचे नातेवाईक