। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राष्ट्रपतीपदाची निवडूक नुकतीच पार पडली असून देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी (दि.6) मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकार्यांकडून केली जाईल. आकडेवारीचा विचार करता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमताचे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.
80 वर्षीय अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चाने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.
धनखड 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजाचे आहेत. संयुक्त जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, अण्णा द्रमुक आणि शिवसेनेने धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांच्या समर्थनामुळे धनखड यांना सुमारे 515 मते मिळण्याची अपेक्षा आहे. अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा पाहता त्यांना जवळपास 200 मते मिळतील, असा अंदाज आहे.