विरोधी पक्षाला नाना पटोलेंचा टोला
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नानाच्या अर्थाचा कोणीही अनर्थ करू नये विरोधी पक्ष हे सरकार अस्थिर असल्याचे दाखवत आहेत. म्हणजे काठावर असणारी आपली माणसे पळून जाऊ नयेत म्हणून केलेला हा खटाटोप असून हा उद्योग भाजपचा दोन तीन वर्षे चालूच राहणार आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्थिर असून पाच वर्षे टिकणार आहे. तिन्ही पक्षाच्या प्रमुखात उत्तम समन्वय आहे. आघाडी सरकार तीन पक्षाचे असून त्यांना पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.
नाना पटोले यांनी पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने हिताची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यात वेगळा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अलिबाग येथे ओबीसी मेळाव्यासाठी आले असता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोकणी माणसाला आधी सरकारवर मदतीबाबत विश्वास नव्हता. मात्र हा विश्वास महाविकास आघाडी सरकारने फोल ठरवला असून नैसर्गिक आपत्ती काळात कोकणला सर्वतोपरी मदत सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणाकडे विशेष लक्ष आहे. कोकणातील नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारने 3700 कोटीचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये निवारा शेड, भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविले जाणार आहे. याबाबत ह्या वर्षापासून काम सुरू होणार आहे. त्यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान टळणार आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ओबीसी समाज हा एकजूट नाही, समाजाची मूठ बांधण्यासाठी समाजाने एकत्र येऊन त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आम्ही कोणाच्याही हीश्याचे आरक्षण मागत नाही मात्र आमच्या हीश्याचे आरक्षण कोणाला देऊ नये. ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र या. सरकार कोणाचेही असो त्यामध्ये ओबीसींचा दबाव चालावा आणि प्रश्न सुटावे यासाठी माझे प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.